उन्हाळ्यात सरबत, शिकंजीसारख्या पेयालाही लिंबू दरवाढीचा फटका
ठाणे : ठाण्यात उन्हाळी तापमानात वाढ होत असल्याने लिंबू, लिंबू सरबत, लिंबू शिकंजी रसाच्या मागणीच्या प्रमाणात वाढ होत आहे, मात्र आता लिंबांची आवक कमी होत असल्याने एरवी 10 ते 15 रुपयाला मिळणारा लिंबू किरकोळ बाजारात २० रुपये दराने मिळत आहे. लिंबू महागल्याने त्याचा फटका उन्हाळ्यात तहान भागवणाऱ्या पेय-प्रेमींना बसू लागला आहे.
गेल्या आठवड्यात ठाण्यातील किरकोळ बाजारात लिंबू 10 ते 15 रुपयांनी विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून लिंबाची आवक कमी होत आहे. त्यात उन्हामुळे लिंबाची मागणी वाढली असून लहान आकाराचे लिंबू २० रुपयांना चार तर मोठ्या आकाराचे लिंबू २० रुपयांना तीन मिळत आहेत.
लिंबू महागल्याने लिंबू सरबत, लिंबू शिकंजी, उसाचे सरबत इत्यादी सरबतांच्या दरातही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात या दरवाढीच्या फटक्यामुळे सामान्य नागरिक बेहाल झाले आहेत.