कल्याण : एस.एस.टी महाविद्यालयात शिका आणि कमवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून सिंधी संस्कृतीची माहीती होण्यासाठी आणि तिचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक मातीपासून हटरी दिवे तयार केले.
शिका आणि कमवा उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कला आणि आर्थिक कष्टासाठी लागणारी मेहनतची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हा उपक्रमामागील उद्देश होता. हटरीचे दिवे बनवण्याकरिता महाविद्यालयातून ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी शंभरपेक्षा जास्त हटरी दिवे तयार केले. घरातील पुरुषांच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी हटरीचे पूजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हटरी दिव्यांची विक्री करून त्यापासून मिळणारे उत्पन्न अनाथ आश्रमात देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलेला प्रेरणा देण्यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ जे. सी.पुरस्वानी आणि उपप्राचार्य खुशबू पुरस्वानी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रा. सुनिल शहा, प्रा. दिलीप आहुजा आणि प्रा. अनिल तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.