आभासी न्यायालयात चालवणार वाहन चालकांविरोधातील खटले

लाखो खटले पडून, तडजोडीची रक्कम कोट्यवधींच्या घरात

ठाणे : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांच्या विरोधातील लाखो खटले पडून आहेत. आता हे खटले आभासी न्यायालयात चालविले जाणार असल्याने जलदगतीने या खटल्यांचा निपटारा होणार आहे.

हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे, दारू पिऊन गाडी चालविणे, बेदरकारपणे गाडी चालविणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, विना परवाना वाहन चालवणे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणे, क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे परमिटशिवाय प्रवासी वाहतूक करणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात वाहतूक शाखेचे पोलीस विविध कलमान्वये गुन्हे दाखल करतात, परंतु न्यायालयात खटला दाखल न करता त्यांच्याकडून दंड वसूल करतात. वाहतूक पोलिसांना दंड वसूल करण्याचे अधिकार नसल्याने त्यांना तडजोडीची रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयात खटला दाखल करावा लागतो. गुन्हा दाखल करून तडजोडीबाबतचा खटला लेखी सादर करण्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांचा वेळ जातो, त्यामुळेच ई चलन फाडल्यानंतर लगेच नियम मोडणाऱ्या वाहनचालकाच्या विरोधात थेट गाडी क्रमांक आणि त्यांच्या मोबाईल नंबरसह आभासी न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.

खटला दाखल करण्यात आल्यानंतर थेट न्यायालयातूनच नियम मोडणाऱ्या वाहन चालकाच्या किंवा वाहन मालकाच्या मोबाइलवर समन्स येऊन तो खटला आभासी न्यायालयात त्याची सुनावणी होईल आणि तडजोडीची रक्कम वाहनचालकाला भरावी लागणार आहे. या बाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की राज्यस्तरावर जेथे ई चलनाची सोय आहे, अशा पोलीस आयुक्तालय परिसरात ही योजना लागू केली जाणार आहे. राज्य स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होऊन तडजोडीची रक्कम लवकर वसूल होण्यास मदत होईल.

ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात चार लाख ३५ हजार खटले वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात प्रलंबित आहेत. मागील लोक अदालतमध्ये त्यापैकी फक्त दोनशे जणच त्यांची बाजू मांडण्यास उपस्थित होते, असे श्री. पाटील यांनी सांगितले.