देशातील पहिली बेलापूर-मुंबई वॉटर टॅक्सी सेवा सुरू

ठाणे : देशातील पहिली बेलापूर-भाऊचा धक्का या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे हे अंतर अवघे ३५ मिनिटांचे झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय जलमार्ग सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. राजन विचारे, आ. रविंद्र फाटक, मंदा म्हात्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी,  ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळासोबतच नवी मुंबई स्पोर्टस सिटी म्हणून विकसित होत आहे हे सर्व लक्षात घेता येथे अनेक पायाभूत सुविधांचा राज्य शासनामार्फत विकास केला जात आहे. गुंतवणूक करतांना  उद्योजक पायाभूत सुविधांचा विचार करतात त्यादृष्टीनेही या सर्व कामांना वेगळे महत्व असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

केंद्राकडून महाराष्ट्रात १३१ प्रकल्प

केंद्रीय मंत्री श्री. सोनोवाल म्हणाले,   सागर किनारपट्टी जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे.  यातून सागरतटीय जिल्ह्यातील लोकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्नआहे. यातून रोजगार निर्मिती करून आर्थिक विकासाचे चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.कोरोना काळातही बेलापूर जेट्टीचे काम सुरु राहिले. नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या जलवाहतूक सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. आणखी काही जे्ट्टी मुंबई हार्बर भागात प्रस्तावित आहेत.

पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या सक्षमीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे सांगतांना त्यांनी ससुन डॉकसह सिंधुदूर्ग आणि रायगडच्या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी काम सुरु असल्याचेही ते म्हणाले.

जलवाहतुकीमुळे नवी मुंबई, ठाणेकरांना लाभ
जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे, नवी मुंबईकरांना याचा लाभ होईल. यामध्ये पर्यावरणाचाही विचार आहे. सर्व मिळून या कामांना गती देऊ या. आज चार मार्गावर जल टॅक्सी सेवा सुरु होत आहे. प्रवाशांचा वेळ, पैसा श्रम तर यामुळे वाचेलच परंतू प्रदुषणालाही आळा बसेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे, कल्याण, नवी मुंबईकरांना जलवाहतूक सेवा उपलब्ध झाली तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. ठाणे-मुंबई सेवाही लवकरच सुरु होईल. एमएमआरक्षेत्रातील वाढत्या नागरिकीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम एमएमआरडीए, सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सागरमाला कार्यक्रमातून केंद्र आणि राज्याच्या  ५०:५० टक्क्यांच्या सहभागातून बंदर विकासाच्या कामाला गती दिल्याचे ते म्हणाले.

नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, अशा विविध ठिकाणाहून जलवाहतूक सुरु झाल्यास प्रवाशांना उत्तम परिवहन सेवा उपलब्ध होईल. काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय नौवहन मंत्र्यांचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.यावेळी खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.