ठाण्यात लाटणे मोर्चा आणि थाळीनाद

महागाईविरोधात शरद पवार गटाचे आंदोलन

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार महिलाध्यक्ष मनिषा भगत यांच्या नेतृत्वाखाली तथा ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी लाटणे मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात मोर्चेकऱ्यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळेच महागाई वाढली असल्याचा आरोप करीत जोरदार थाळीनादही केला.

पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्यानंतर इंधनाच्या दरात अवघ्या एका आठवड्यात दोन वेळा दरवाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने ही दरवाढ आपल्या भांडवलदार मित्रांसाठी केली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बहुसंख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकरी महिलांनी हातात घेतलेल्य् पोळीपाट, लाटणे थाळी – चमचा यांचा नाद करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी मेलोडी चाॅकलेटचे वाटपही करण्यात आले.

या आंदोलनात महिला कार्याध्यक्ष फुलबानो पटेल, नगरसेविका पल्लवी जगताप, मर्जिया पठाण, शशिकला पुजारी, माधुरी सोनार, कमरजा मुलानी, मनिषा पाटील, आदी सहभागी झाले होते.