कल्याणमधून मुंबई, नवी मुंबई, वसई-विरारसाठी जलवाहतूक लवकरच
मुंबई: कल्याण रोड, ऐरोली काटई फ्री वे, वॉटर ट्रान्सपोर्ट, मेट्रो विस्तार अशा बड्या प्रकल्पांमुळे कल्याण-डोंबिवली नजिकच्या काळातील विकास आणि रोजगारांचे केंद्र बनेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. मुंबई आयोजित पायाभूत सेवा क्षेत्रासंबधी चर्चासत्रात ते बोलत होते.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी महायुती सरकार एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्स, ग्रोथ सेंटर्स, लॉजेस्टिक सेंटर्स उभारत आहे. ‘एमएमआर’च्या उत्तरेला वाढवण बंदर विकसित होत आहे. या प्रकल्पात तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून लाखो नोकऱ्या निर्माण होतील. उजवीकडे नवी मुंबई, अलिबाग हा पट्टा विकसित होत आहे. तिसऱ्या बाजूला ‘एमएमआर’मधला सर्वात वेगाने विकसित होणारा भाग म्हणजे कल्याण लोकसभा मतदार संघ आहे. पायाभूत सेवा क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने मुंबई महानगर क्षेत्राचं येत्या काही वर्षात भरीव योगदान राहील. विकसित भारत २०४७ पर्यंत मुंबई एमएमआर क्षेत्राची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल.
ते पुढे म्हणाले की, ६८०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले मुंबई महानगर क्षेत्र आजच्या घडीला वेगाने विकसित होत आहे. या ठिकाणी पायाभूत सेवा, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा आणि गृहनिर्माणावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे, असे ते म्हणाले. एमएमआरमध्ये चार लाख कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात ३७७ किमी लांबीचे जगातील सर्वात मोठे नेटवर्क उभारले जात आहे. मुंबईवरील भार कमी करताना ठाणे, कल्याण, तळोजा लगतच्या उपनगरांमध्ये मेट्रो विस्तार, डेटा सेंटर्स, कौशल्य विकास केंद्र विकसित केले जातील. ज्यामुळे स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळतील आणि मुंबई किंवा बड्या शहरांमध्ये त्यांना प्रवास करावा लागणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात १०१ जलवाहतूक मार्ग विकसित केले जाणार आहेत. त्यापैकी कल्याणमधून वसई-विरार, नवी मुंबई आणि मुंबईला जलमार्गाने लवकरच जोडले जाईल. या ठिकाणी जेट्टींचे काम सुरु आहे. कल्याणला लाभलेल्या खाडीमधून हे सर्व मार्ग जोडले जातील, असे ते म्हणाले. बदलापूरहून नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांसाठी अँक्सेस कंट्रोल रोड तयार केला जात आहे. अँक्सेस कंट्रोलमुळे अंतर्गत वाहतूक कोंडीतून स्थानिकांची सुटका होईल आणि त्यांना या मार्गाने थेट मुंबई गाठणे शक्य होईल असे ते म्हणाले. अंबरनाथमधील ऐतिहासिक शिवमंदीराचा सोमनाथ, उज्जैन महाकालच्या धर्तीवर विकास केला जाईल. यासाठी २०० कोटी खर्च होणार असून यातून आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.