लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांसह कुटुंबियांनी दिली प्रकृतीविषयी माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. पण अद्याप त्या आयसीयूमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लता मंगेशकर याची प्रकृती कशी आहे, याबाबत त्यांची भाची रचना शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

रचना शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लता मंगेशकर यांना शनिवारी ८ जानेवरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. सध्या त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यामुळे आम्ही आनंदी आहोत. चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनामुळे लता मंगेशकरांची प्रकृती सुधारत आहे. पण यासोबतच आमची काही गोपनीयताही लक्षात ठेवा,” असेही त्यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले. तर दुसरीकडे गुरुवारी १३ जानेवारीला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा होत आहे. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी म्हणाले, “त्या अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये आहेत. पण त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे.”

दरम्यान यापूर्वी रचना शाह यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, लतादीदी यांना कोविड-19 ची सौम्य लक्षणे आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले होते. याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.