नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्थापत्य विभागात कामांच्या बाबतीत आधीच फिक्सिंग केली जात असून नंतर निविदांचा फार्स केला जात आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये केलेल्या कामाची फेब्रुवारी २०२४ मध्ये निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई मनपात पुन्हा एकदा निविदापूर्व कामे करून भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था असो की इतर प्रधिकारणे, यामध्ये स्थापत्य विषयक कामे असतील तर ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार करतात. अशा कामात पारदर्शकता असावी म्हणून ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रकिया राबवून न्यूनतम बोली लावणाऱ्यास ते काम दिले जाते. मात्र नवी मुंबई मनपात प्रशासकीय राजवट असल्याने अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला आहे.
२०२२ मध्ये ४० कोटींची अशी कामे करून भ्रष्टाचार केल्याबाबत आरोप झाला होता आणि याबाबत चौकशीची मागणी विधानसभेत आमदार गणेश नाईक यांनी केली होती. मात्र त्या चौकशीचे पुढे काय झाले? याचे कोडे अजूनही नवी मुंबईकरांना पडले आहे. आता मागील वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये बेलापूर विभागातील नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांवर गणेश विसर्जनसंबधी बॅनर पुरवणे आणि बसवण्याचे काम करण्यात आले होते. त्याची फेरनिविदा १६ फेब्रुवारी २०२४ ला काढण्यात आली आहे. त्यामुळे हे काम अधिकाऱ्याच्या मर्जीतील ठेकेदाराने केले असून आता फक्त निविदेचा फार्स करून फक्त कागद रंगवले जाणार आहेत.