गेल्या वर्षभरात ४४२ प्रवासी जखमी, रेल्वे अपघातांत २७७ प्रवाशांचा मृत्यू

र्निबध शिथिल होताच प्रवासी संख्येत प्रचंड वाढ

मुंबई : करोना संसर्गामुळे लागू केलेले र्निबध शिथिल होताच रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. त्याचबरोबर रेल्वे अपघातांत मृत्यू आणि जखमी होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या काळात लोकल, मेल आणि एक्स्प्रेसमधून पडून २७७ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४४२ प्रवासी जखमी झाले आहेत.

मुंबईत करोनाचा संसर्ग सुरू होताच लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली. हळूहळू मुंबईतील करोना संसर्गाची पहिली लाट ओसरली. त्यानंतर मुंबईत करोनाची दुसरी लाट आली. ही लाट ओसरताच दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर दोन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले आणि प्रवासी संख्या वाढू लागली. त्याचबरोबर अपघातांचेही प्रमाण वाढले.

जानेवारी ते डिसेंबर २०२१ या काळात लोकलमधील वाढती गर्दी, तसेच विनाकारण दरवाजाजवळ लटकून स्टंट करणाऱ्यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले.

करोना संसर्गामुळे २०२० मध्ये लोकल प्रवासावर र्निबध होते. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्याही कमी होती. २०२० मध्ये १७७ जणांचा लोकल, एक्स्प्रेमधून पडून मृत्यू झाला, तर ३६१ प्रवासी जखमी झाले होते.  लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू लोकलमधून पडून एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव ते राम मंदिर स्थानकादरम्यान घडली. २१ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत या तरुणाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचा अंदाज लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत झालेल्या तरुणाचे नाव रतन विश्वकर्मा असे आहे. रतन हा नालासोपारा पूर्वेला आपल्या मोठय़ा भावासोबत राहत होता. तर आई-वडील हे गावी असतात. रतन हा सुतार होता. २१ मार्चला तो अंधेरीला काही कामानिमित्त गेला होता. अंधेरीहून त्याने रात्री विरार जलद लोकल पकडली. लोकल गोरेगाव-राम मंदिर स्थानकांदरम्यान येताच तोल जाऊन तो रुळालगतच पडला. यासंदर्भात बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी गर्दीमुळे रतनचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. रतनच्या प्रवासाची वेळ, तसेच तो रुळालगतच आणि ज्या प्रकारे पडलेला होता, ती सर्व माहिती घेतली असता हा अंदाज वर्तवल्याचे ते म्हणाले. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

१८९ मध्य रेल्वे

८८ पश्चिम रेल्वे

२७७ एकूण मृत