केव्हीला नाल्याचे पाणी गृहसंकुलांमध्ये उलटले

नालेसफाई ठेकेदार आणि बांधकाम ठेकेदारावर कारवाईची मागणी

ठाणे: वादग्रस्त ठरलेल्या केव्हीला नाल्याच्या सदोष बांधकामाचे आणि नालेसफाईचे पितळ नुकत्याच पडलेल्या पावसात उघडे पडले. या बांधकामामुळे साफ न झालेला कचरा नाल्यात तुंबला आणि नाल्याचे घाण पाणी परिसरातील गृहसंकुल आणि चाळींमध्ये शिरले. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिला. या प्रकरणी बांधकाम आणि नालेसफाई ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

गेल्या चार वर्षांपासून केव्हीला नाल्याचे बांधकाम करून त्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून हे घाण पाणी बाजूच्या उथळसर भागातील गृहसंकुलांमध्ये आणि पुढे क्रांतीनगरपर्यंत असलेल्या घरांमध्ये उलटण्याची भीती काही दक्ष नागरिकांनी समाज माध्यमातून व्यक्त केली होती. याबाबत महापालिका प्रशासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा फटका नुकत्याच झालेल्या पावसाने बसला. बुधवारी पडलेल्या पावसात फक्त १५ मिनिटांत नाल्यावरील बांधकामामुळे कचरा आणि घाण पाणी तुंबले. हे पाणी केव्हीला रस्त्यालगत असलेल्या भागिरथी जगन्नाथ इमारतीच्या आवारात आणि चाळीत शिरले. या गुडघाभर पाण्यात रहिवाशांच्या वाहनांचे नुकसान झालेच शिवाय रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिल्याची माहिती येथील रहिवासी अपर्णा राणे यांनी दिली. आता अशी स्थिती उद्भवत असेल तर पावसाळ्यात संपूर्ण परिसरच पाण्याखाली जाईल. आज अशी स्थिती दोनवेळा उद्भवल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचेही त्या म्हणाल्या.

हा नाला उंचावरून वाहत येत खाडीकडे जाऊन मिळतो. केव्हीला जवळील नाल्याचा भाग हा तीव्र उतारावर आहे. त्यामुळे वरून मोठ्या प्रमाणात वाहत येणारा कचरा आणि घाण पाणी केव्हीला लगत नाल्यावर केलेल्या बांधकामामुळे अडते. अशावेळी पावसात ही पाणी नाल्याच्या वरून वाहण्याची आणि आजूबाजूचा परिसर जलमय होण्याची भीती दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे आयुक्तांनी नालेसफाईला वेग देण्याचे निर्देश दिले असताना अनेक ठिकाणी नाल्यांची पूर्ण सफाई झालेली नाही. केव्हीला नाल्यात आज तुंबलेल्या कचऱ्याने नाले सफाईचे पितळही उघडे पडले आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठेकेदाराने नाल्यातून कचरा काढला, परंतु नाल्यावरील बांधकामामुळे पुन्हा नाल्यात कचरा मोठ्या प्रमाणात तुंबला.

सदोष नाले बांधणी आणि नालेसफाईचा बोजवारा यामुळे नागरिकांचे नाहक नुकसान होऊन मनस्ताप झाला. याप्रकरणी संबंधित अधिकारी, नालेसफाई ठेकेदार आणि बांधकाम ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.