सर्वाधिक ४५ इमारतींमध्ये शेकडो रहिवासी जीव मुठीत घेऊन
ठाणे: ठाणे महापालिका हद्दीत ६७ अतिधोकादायक इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे जीव मुठीत धरून राहत असून सर्वाधिक ४५ इमारती नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीत आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी या इमारतींवर हातोडा चालणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वागळे इस्टेट आणि दिवा प्रभाग हद्दीत एकाही अतिधोकादायक इमारतींची नोंद नाही.
ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील अति धोकादायक सी१ कॅटेगरीमधील ६७ इमारतींची यादी जाहीर करण्यात आल्या असून त्या इमारती निष्कासित करण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. १७० इमारती या सी २ कॅटेगरीमध्ये आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी घरे खाली करून त्याची दुरुस्ती करून नागरिकांना वापरता येतील.
महापालिका हद्दीत नऊ प्रभाग समित्यांमध्ये सर्वाधिक ४५ अतिधोकादायक इमारती या कोपरी-नौपाडा प्रभाग समितीमध्ये आहेत. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये सहा इमारती अतिधोकादायक आहेत तर प्रत्येकी पाच अतिधोकादायक इमारती उथळसर आणि मुंब्रा प्रभाग समितीमध्ये आहेत. चार इमारती कळवा प्रभाग समितीमध्ये आहेत. प्रत्येकी एक अति धोकादायक इमारत वर्तकनगर आणि मानपाडा-माजिवडे प्रभाग समितीमध्ये असून दिवा आणि वागळे इस्टेट प्रभाग समितीमध्ये एकही इमारत अति धोकादायक नसल्याची माहिती महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.
सी २ कॅटेगरीच्या इमारती सर्वाधिक ९४ मुंब्रा येथे असून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. १५ इमारती नौपाडा-कोपरी तर १४ इमारती वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये आहेत. माजिवडे-मानपाडा आणि कळवा प्रभाग समितीमध्ये अनुक्रमे १२ आणि ११ इमारती धोकादायक आहेत. उथळसर येथे सहा, वागळेमध्ये तीन आणि दोन इमारती दिवा येथे असून त्यांची दुरुस्ती करावी लागणार असल्याचे श्री. हेरवाडे म्हणाले.