ठाणे : बारा बंगलामार्गे ठाणे कोपरी पूर्वहून नौपाड्याच्या दिशेने जाणा-या उड्डाणपुलाच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना रविवारी विराम मिळाला. या रस्त्यावर गेल्या १० दिवसांपासून काँक्रिटचे अनेक थर पसरवल्यानंतर हा रस्ता पूर्णत: काँक्रिटचा झाला आहे.
ही कामे करण्यासाठी सहा-सात मजूर सकाळी ९ पासून सायंकाळ ८ वाजेपर्यंत राबत होते आणि विविध कामे करण्यासाठीही रात्री ९ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंगाली कामगार कार्यरत होते.
हरीनिवासहून कोपरीकडे जाणा-या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले असले तरी, आणखी आठ ते १० दिवस ‘क्युरिंग’साठी वाट पाहावी लागेल. क्युरिंगच्या कालावधीत या पुलाचा वापर कोणत्याही वाहनांना खुला होणार नसल्याने चालकांना पुलाजवळील किंवा अन्य मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
पाऊस गेल्यानंतर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे करण्याचे नियोजन महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आखले होते. कोपरीहून हरीनिवास सर्कलकडे जाणारी वाहतूक, हरीनिवास सर्कलहून कोपरीकडे जाणा-या उड्डाणपुलावर यंदाच्या पावसाळ्यात मोठे खड्डे पडले होते तर काही ठिकाणी रस्त्यांवरील मास्टिक खराब असल्याने दुचाकी वाहने घसरुन पडल्याच्या घटना झाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूचे रस्ते अत्यंत खराब असल्यामुळे या पुलाची दुरुस्ती, डागडुजी करण्याची जोरदार मागणी वाहने चालकांकडून होत होती.
या उड्डाणपुलावर पावसाआधी आणि पावसाळ्यातही मोठे खड्डे पडले होते. तेथील रस्त्यांंची चार महिने वाट लागली होती. याबाबतच्या लेखी आणि सोशल मिडीयावर तक्रारी झाल्या होत्या. पाऊस थांबल्यानंतर या उड्डाणपुलाची निव्वळ डागडुजी न करता हा पूल काँक्रिटचा करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत होते. पावसाळा संपल्यानंतर पुलाच्या डागडुजींची कामे हाती घेण्यात आली. मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे उखडून तेथे सपाटीकरण करण्यात आले. सर्वप्रथम कोपरीहून नौपाड्याकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहतुकींसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात आला.