पाच निर्यातदारांकडून २७ टन आंबा
नवी मुंबई: वाशीतील महाराष्ट्र शासनाच्या कृषि पणन मंडळाच्या प्रमुख निर्यात सुविधा केंद्रांवरून अमेरिकेला यंदाच्या हापूस निर्यातीची पहिली खेप रवाना झाली असून २७ टन आंबा निर्यात करण्यात आला आहे.
देशांतर्गत मागणीबरोबर परदेशीही हापूस आंब्याला पसंती दिली जात आहे. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना नियमांच्या चौकटीतून आंबा निर्यात करावा लागतो. आंबा निर्यातीकरीता आंब्याचा आकार, वजन, आणि दर्जा महत्वाचा असतो. आखाती देश, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत, युरोपियन देश, जपान, साऊथ कोरिया या ठिकाणी हापूस आंबा निर्यात होतो. वाशीतील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या प्रमुख निर्यात सुविधा केंद्रांवरून यंदा चार हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून ४ एप्रिलपासून निर्यातीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी अमेरिकेला २७ टन आंबा निर्यात करण्यात आला आहे.
प्रत्येक देशात आंबा निर्यात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. अमेरिकेला आंबा निर्यात करण्यासाठी त्यावर दोन प्रकारे प्रकिया करण्यात आली. उष्णजल प्रक्रिया (हॉट वॉटर ट्रीटमेंट)- या प्रक्रियेत ४६ अंश सेल्सियस तापमानात ६० मिनिटे आंबा गरम पाण्यात ठेवला जातो. त्यामुळे आंब्यातील फळमाशी असल्यास नष्ट होते.