ठाणे : कोकण भूमी प्रतिष्ठान-समृध्द कोकण प्रदेश संघटना आयोजित ग्लोबल कोकण उद्योग परिषद व कोकण आयडॉल पुरस्कार सोहळ्यात उद्योजक आणि स्पर्धा परीक्षा तसेच अन्य क्षेत्रात सामाजिक कार्यकर्ता म्हणून निलेश सांबरे यांना कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, डॉ.अरुण सावंत व अनेक उद्योजक उपस्थित होते. २७ मार्च २०२२ रोजी, आयलिफ रिट्ज बॅंक्वेट, आर मॉल, घोडबंदर, ठाणे(प) येथे हा सोहळा झाला.
समृद्ध कोकण प्रदेश संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांनी निलेश सांबरे यांच्या विविध स्तरांवरील लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. तर पुरस्काराबाबत बोलताना श्री. सांबरे म्हणाले, गेल्या १० वर्षांत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गरिबांना आरोग्य, शिक्षण आदी मोफत सेवा दिल्या जात आहेत. वर्षभर आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्र शिबिरे, कर्करोग शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया असे उपक्रम राबवत आहोत.
पालघर जिल्ह्यात विक्रमगडमध्ये जिजाऊनं भगवान महादेव सांबरे रुग्णालय उभारले असून तिथे गेल्या सहा वर्षांपासून सर्व उपचार होत आहेत. आपल्या कोकणातील पाचही जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांमध्येही अशी रुग्णालये उभारण्याचा मानस आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे कर्करोग रुग्णालय आणि सर्वसाधारण रुग्णालयही सुरु होणार आहे. एमपीएससी, यूपीएससी, नीट, पोलीस भरती या सर्व परीक्षांसाठी मोफत अभ्यास वर्ग चालवले जातात. पालघरच्या मोखाड्यापासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत ३९ मोफत वाचनालयं गावोगावी उभारली आहेत.
प्रत्येक वर्षी कोकणाच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक तरी आयएएस, आयपीएस अधिकारी घडवण्याचं जिजाऊचं स्वप्न आहे. आपल्या जिल्ह्यांमध्ये पानाच्या टपरीपासून ते फाइव्ह स्टार हॉटेलपर्यंत मिळेल तो व्यवसाय करणारे तरुण उभे राहिले पाहिजेत, हे जिजाऊचं स्वप्न आहे. तसेच कोकणच्या पाचही जिल्ह्यातील कुठलाही रुग्ण ज्याच्याकडे पैसे नाही किंवा ज्यांना आई-वडील नाही अशा मुलांना सांभाळण्याचं काम देखील जिजाऊ संस्था करत आहे, अशी माहिती श्री.सांबरे यांनी दिली.