कळवा पीचवर फलंदाजाला बाद करण्याचे कौशल्य नजीब मुल्लांकडे !

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांची चौफेर फटकेबाजी

ठाणे : कळव्यातील पीचवर चांगल्या फलंदाजाला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद करण्याचे कौशल्य नजीब मुल्ला यांच्याकडे आहे. नजीब व आनंद या जोडगळीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही देत आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली.

९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वतीने “नजीब मुल्ला ट्रॉफी २०२४” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रिकेट सामन्याच्या बक्षीस समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष व ठाणे जिल्ह्याचे नेते वसंत डावखरे यांच्या काळात दादोजी कोंडदेव स्टेडीयममध्ये मी आलो होतो. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात टेस्ट मॅचेस होत असत. पण आमचे प्रदेश सहकारी नजीब मुल्ला यांनी पहिल्यांदाच या स्टेडीयमवर टेनिस स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर भरवून सर्वसामान्य तरुण क्रिकेटपटूंना स्टेडीयमच्या भव्य वास्तूत खेळण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. नजीब मुल्ला हे राजकारणात, समाजकारणात यशस्वी झाले असून धर्मनिरपेक्ष विचारांचे पाईक आहेत. बॅडपीचवर यशस्वी फलंदाजाला यष्टीचित करण्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. यामुळे कळव्यातील पीचवरही चांगल्या समजल्या जाणाऱ्या फलंदाजाला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद करण्याचे कौशल्य नजीब मुल्ला यांच्याकडे आहे, अशी फटकेबाजी करत नजीब व आनंद या जोडगळीच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे, असे उद्गार खासदार सुनील तटकरे यांनी काढले.

या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसेच संपूर्ण देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये राबोडी विभाग, ठाणे परिसरातील ग्रामीण भागातील ‘एक गाव एक संघ’ या संकल्पनेनुसार १६ संघ, ठाणे विभागामधील १५ संघ, कळवा-मुंब्रा परिसरातील ८ संघ, गुजरात, मुंबई, पुणे, पालघर, राजकोट, दिल्ली येथील ऑल इंडिया ओपन असे १२ संघ तसेच ठाणे शहरातील पत्रकारांचा संघ, ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचारीवर्ग यांचा संघ, ठाणे शहरातील पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारीवर्ग यांचा संघ, ठाणे शहरातील डॉक्टर्स यांचा संघ, ठाणे शहरातील वकिलांचा संघ, ठाणे शहरातील महावितरणमधील अधिकारी-कर्मचारीवर्गाचा संघ, राष्ट्रवादी काँग्रेसचा संघ, मराठी सिनेकलाकार यांचा संघ आणि टीम नजीब मुल्ला म्हणून सहकाऱ्यांचा संघ, ठाणे जिल्ह्यातील संघ तसेच प्रदर्शनीय सामने ज्यामध्ये ठाणे विरुद्ध रायगड आणि टेनिस क्षेत्रातील नामांकित महिला क्रिकेट संघांचे सामने हे मुख्य आकर्षण होते.ऑल इंडिया ओपन संघाचे अंतिम सामनेही यावेळी खेळविण्यात आले. यात ‘इराकी वाॅरिअर्स’ हा संघ विजेता ठरला असून मॅन ऑफ द सिरीज विजय पावले यांना चारचाकी हुंडाई एक्स्टर ही गाडी बक्षीस म्हणून मिळाली.

याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव, परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसिन शेख, अविनाश पवार, कल्पेश मिठबावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.