कल्याण : मध्यप्रदेशमधून अपहरण झालेल्या सहा महिन्यांच्या बाळाची 29 लाखांना विक्री केल्याच्या गंभीर प्रकरणाची कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या आठ तासांत उकल करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी 53 वर्षीय शिक्षक आणि त्याचा माजी विद्यार्थी त्याची पत्नीसह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
6 मे रोजी मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्याच्या सिव्हिल लाईन भागातून, फुटपाथवर झोपलेल्या फेरीवाल्या जोडप्याच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याचे अपहरण झाले होते. याबाबत मध्यप्रदेश पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या गुन्ह्यातील संशयित आरोपी कल्याणच्या शहाड परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्याद्वारे मध्यप्रदेश पोलिसांनी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्याशी संपर्क करून या संवेदनशील गुन्ह्याची माहिती दिली. आणि त्यानुसार कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनीही गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासला सुरुवात केली.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, एएसआय ठोके, पवार, बुधकर, भाटकर, वायकर, राजू लोखंडे, वागळे, महिला हवालदार गायकवाड, पोलीस नाईक सुधीर पाटील यांची दोन पथके स्थापन करण्यात आली. या दोन्ही पथकांनी अतिशय कौशल्याने आणि वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या आठ तासांत या संवेदनशील गुन्ह्यातील चार पुरुष आणि दोघा महिला आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आणि सहा महिन्यांच्या गोंडस चिमुरड्याची सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मध्यप्रदेशमध्ये ज्यांचे बाळ चोरीला गेले होते, त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी त्वरीत सीसीटीव्हीच्या सहाय्याने बाळाचे अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. या अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचे नाव सांगितले. सोनी दांम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्यप्रदेश पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरीत कल्याण पोलिसांशी संपर्क साधला.
कल्याणच्या खडकापाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सांगितले की, हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आले आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतले असता प्रदीपने सांगितले की, हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अर्वी येरुणकरला देण्यात आले आहे. पोलिसांनी येरुणकर पती-पत्नीला ताब्यात घेतले. त्यांनी सांगितले की, सहा महिन्याचे बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बाळाची सुटका केली असून बाळ सुखरूप आहे.