20 पथकांची 75 तास शोधमोहीम
पाच जणांना ठोकल्या बेड्या
डोंबिवली: दीड कोटीच्या खंडणीसाठी डोंबिवलीत एका 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. पण पोलिसांनी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे 75 तासांत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या.
डोंबिलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार येताच पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी या मुलाला घेऊन ठाणे, भिवंडी, नाशिक, पालघर आणि गुजरात अशी ठिकाणे बदलत असल्याने तब्बल 20 पथकांनी या मुलाचा शोध सुरू केला. डोंबिवलीपासून सुरू झालेला पाठलाग सुरतला संपला व पोलिसांनी बारा वर्षाच्या रुद्रची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाच आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
9 नोव्हेंबर रोजी डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी परिसरात राहणारे व्यवसायिक रणजीत झा यांचा 12 वर्षीय मुलगा रुद्र क्लासमधून घरी परतला नाही. झा यांनी मुलांची काही वेळ वाट बघितली, मात्र मुलगा न आल्याने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. मानपाडा पोलिसांनी रुद्र झा या मुलाच्या शोध घेण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे रणजीत झा यांच्या मोबाईलवर एक फोन आला, संबंधित व्यक्तीने तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून मुलाची सुखरूप सुटका करायची असेल तर एक कोटी रुपये द्या अशी धमकी दिली. दुसऱ्या दिवशी फोन करणाऱ्या व्यक्तीने दीड कोटीची मागणी केली. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांचा नेतृत्वात पोलिसांची 20 पथकं नेमण्यात आली. ज्या क्लास मधून रुद्रचे अपहरण झाले होते, त्या क्लासचा आजूबाजूच्या परिसतील पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. या सीसीटीव्हीमध्ये अपहरण करणाऱ्या आरोपींनी जी गाडी वापरली होती, त्या गाडीच्या नंबर दिसला. आरोपी देखील स्पष्ट दिसले. यानंतर पोलिसांच्या तपास सुरू झाला. गाडीचा नंबर बनावट होता. तर आरोपींकडे असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलीस पथक आरोपींच्या शोधात होते. आधी माहिती मिळाली की आरोपी पालघर येथील एका ठिकाणी आहेत. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचले. आरोपींच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह पालघर जिल्ह्यातील जवळपास 400 स्थानिक लोकांची पोलिसांनी मदत घेतली. तरी पण आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटले.