आजपासून खेलो इंडिया युवा क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

पंचकुला : खेलो इंडिया युवा क्रीडा महोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ होत असून, गतविजेत्या महाराष्ट्रापुढे यजमान हरयाणाचे कडवे आव्हान असेल. ही क्रीडा स्पर्धा १३ जूनपर्यंत चालणार आहे. उद्घाटन सोहळय़ाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. २०१८ मध्ये झालेल्या पहिल्या खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत हरयाणाने सर्वाधिक पदके जिंकली होती; परंतु पुढच्याच वर्षी पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने ८५ सुवर्णपदकांसह वर्चस्व गाजवले. अनेक ऑलिम्पिक आणि आशियाई पदक विजेते घडवणाऱ्या हरयाणाला या स्पर्धेत ६२ सुवर्ण पदके मिळवता आली होती. त्यानंतर २०२० मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेतही महाराष्ट्राने ७८ सुवर्णपदकांनिशी अग्रस्थान पटकावले होते.

यंदा १८६६ पदकांसाठी (५४५ सुवर्ण, ५४५ रौप्य आणि ७७६ कांस्य) ही क्रीडा स्पर्धा होणार आहे. ८५०० क्रीडापटू, मार्गदर्शक आणि पदाधिकारी या स्पर्धेसाठी येथे दाखल झाले आहेत. पंचकुला, अंबाला, शाहबाद, चंडिगढ आणि दिल्ली अशा पाच ठिकाणी २५ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या दोन्ही कबड्डी संघांनी विजयी सलामी नोंदवली. मुलांच्या संघाने आंध्र प्रदेशचा ४८-२९ असा पराभव केला, तर मुलींच्या संघाने झारखंडचा ६०-१५ असा धुव्वा उडवला. पुरुष गटात शिवम पठारे, पृथ्वीराज चव्हाण यांनी नेत्रदीपक चढाया केल्या, तर दादासाहेब पुजारी, रोहन तुपारे, साईप्रसाद पाटील, जयेश महाजन यांनी उत्कृष्ट पकडी केल्या. महिला गटात हरजीतसिंग संधूने चढायांचे ११ गुण कमावले, तर ऋतुजा अवघडीने ८ गुण मिळवले. याशिका पुजारीनेही (५ गुण) त्यांना छान साथ दिली. निकिता लंगोटे आणि कोमल ससाणे यांनी नेत्रदीपक पकडी केल्या.