खासगी वाहनांना खाक्या; पुलाखाली पोलीस चौक्या

उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे वाहतूक विभागाकडूनच उल्लंघन

ठाणे : शहरातील उड्डाणपुलाखाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाचे असताना शहरातील महत्वाच्या उड्डाणपुलाखाली वाहतूक विभागाने चौक्या उभारल्या आहेत. बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना दंड आकारणाऱ्या या विभागाकडून कोणी दंड आकारायचा, असा प्रश्न जागरूक नागरिक विचारत आहेत.

ठाणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. शहरात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे ठाण्याच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असून अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंग देखील नागरिकांकडून केली जाते. नुकतेच वाहतूक विभागाच्या वतीने ठाणे महापालिकेला पत्र देण्यात आले असून या पत्रामध्ये बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी नियमांकडे बोट दाखवत ठाणे महापालिकेला सूचना करणाऱ्या वाहतूक विभागाच्याच वतीने नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे उघड झाले आहे.

शहरात माजिवडा उड्डाणपुलाखाली गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक विभागाची चौकी आहे. दुसरीकडे वाघबीळ, कापूरबावडी, कळवा तसेच अन्य ठिकाणी देखील वाहतूक विभागाच्या चौक्या उभारण्यात आल्या असून यामध्ये केवळ वाघबीळ उड्डाणपुलाखालील वाहतूक विभागाच्या चौकीला परवानगी देण्यात आली असून अन्य चौक्यांना परवानगी दिली आहे आहे की नाही हे तपासून सांगावे लागेल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे तीन हात नाका येथील सेवा रस्त्याचा वापर देखिल वाहतूक पोलिस नो पार्किंगमधून उचलून आणलेल्या गाड्या ठेवण्यासाठी करत असून हा सेवा रस्ता कोणी दिला असा प्रश्न जागरूक नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्वतः बेकायदेशीरपणे रस्त्यावर गाड्या उभ्या करणाऱ्या पोलिसांकडून कोण दंड वसूल करणार असा प्रश्न विचारला जात आहे.
याबाबत वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.