ठाणे: नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महापालिकांच्या निवडणुका जुलै महिन्यात तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ठाणे, मुंबई, पुणेसह इतर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, त्यामुळे निवडणूक आयोग निवडणूक घेण्याच्या तयारीला लागला आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राज्यातील मुख्य सचिवांच्या बरोबर बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर जून-जुलै महिन्यात निवडणूक घ्यावी की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी ज्या महापालिकांच्या प्रशासकाची मुदत संपून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्या महापालिकांची निवडणूक जून-जुलै दरम्यान घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली असल्याचे सूत्राने सांगितले आहे. तसे झाले तर जिल्ह्यातील नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुका लागू शकतात तर ठाणे, मुंबई, पुणे, औरंगाबाद यांच्यासह १५ महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होऊ शकतात. या महापालिकांमध्ये ६ मार्चपासून प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. या राजवटीस सहा महिने पूर्ण झाले नाहीत, त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यानंतर घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकाच वेळी निवडणुका घेणे आयोगाला शक्य नाही. निवडणुकीकरिता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी, कर्मचारी लागतात. एकाच वेळी एवढा स्टाफ उपलब्ध होणे शक्य नाही, त्यामुळेच निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जातील, असे देखील तो अधिकारी म्हणाला.