ठाणे : मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयानंतर कौसा रुग्णालयाचेही आऊटसोर्सिंग करण्याचा महत्वाचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. १०० खाटांचे हे रुग्णालय खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात येणार असून यामध्ये खाजगी संस्थेच्या माध्यमातूनच सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना देण्यात येणार आहेत.
पालिकेच्या रुग्णायातील सेवा आऊटसोर्सिंग करण्याचा महत्वाचा निर्णय आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. यात कौसा रुग्णालयाचाही समावेश आहे. यामध्ये रुग्णालयाची सर्व इमारतच खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. केवळ पाण्याचे बिल महापालिकेच्या वतीने अदा करण्यात येणार असून बाकी सर्व यंत्रणा संबंधित खासगी संस्थेला उभारावी लागणार आहे. सध्या या ठिकाणी केवळ बाहयरुग्ण विभाग आणि प्रसूती सुरु असून जेव्हा खासगी संस्था रुग्णालय चालवायला घेईल त्या दिवसापासून मेडिकल सेवा, डायलेसिस सेंटर, चार ऑपरेशन एटर, सहा बेडचा लहान मुलांचा विभाग, १९ बेडचा माता आणि मुलांचा विभाग, अतिदक्षता विभाग, आणि इतर सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंब्रा आणि कौसा विभागाची लोकसंख्या लक्षात घेऊन २००९ साली कौसा रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर २०१३ साली या प्रस्तावाला चालना मिळाली तर ऑक्टोबर २०१४ रोजी या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. आता या रुग्णालयाचे काम देखील पूर्ण झाले आहे. विशेष करून मुंब्रा. दिवा, शीळ,डायघर,आणि नवी मुंबईच्या नागरिकांना या रुग्णालयाचा फायदा होणार आहे.
नो कॅश काउंटर पद्धतीने मोफत उपचार
केंद्राची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत ‘नो कॅश काऊंटर’ पद्धतीनुसार रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या योजनांमधून लाभार्थ्यांच्या मागे मिळणारा मोबदला हा संस्थेला मिळणार आहे. तर दुसरीकडे पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच सर्वप्रकारच्या सेवा देण्याचा महापालिकेच्या ताण यामुळे कमी होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धर्मवीर आनंद दिघे हार्टकेअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरला रुग्णांचा प्रतिसाद मिळत असून गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना हे सेंटर वरदान ठरत आहे.