काटई ते अंबरनाथ प्रवास होणार वेगवान

एमआयडीसीकडून १२६ कोटी ४६ लाखांच्या निविदा जाहीर

डोंबिवली : काटई ते अंबरनाथ या मार्गातील खोणी ते फॉरेस्ट नाका येथील रस्त्याचे लवकरच काँक्रटीकरण होणार आहे. या रस्ते कामाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने  ११६.६४ कोटी रुपयांच्या निविदा जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर  डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको नाका ते डीएनएस जंक्शन रस्त्याचेही काँक्रीटीकरण होणार असून यासाठी  ९.८२ कोटी रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाबात एमआयडीसी प्रशासनासमवेत बैठका घेऊन वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठ्वपुराव्याला यश मिळाले आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काँक्रीटीकरण होऊन येथील नागरिकांना  मोठा दिलासा मिळणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामाला गती मिळाली आहे. यातील बहुतांश रस्त्यांची कामे पूर्णत्वास आली आहे तर अनेक नव्या रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. या बरोबरच आता काटई ते अंबरनाथ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून नुकतीच ११६ कोटी ६४ लाख ४२ हजार रुपयांची   निविदा जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत काकोळे येथील वालधुनी नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या मार्गावरून डोंबिवलीच्या दिशेने जाण्याचा आणि परतीचा मार्ग हा  समांतर नसल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागती. या पुलाच्या उभारणी नंतर दोन्ही मार्गिका समांतर स्थितीत येणार असून यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.या रस्त्याच्या कामाबरोबरच डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको नाका ते डीएनएस जंक्शन आणि डोंबिवली औद्योगिक क्षेत्राबाहेरील रोटेक्स सेवा रस्त्याचेही काँक्रटीकरण होणार आहे. या कामासाठी एमआयडीसीकडून ९ कोटी ८२ लाख २८ हजार रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत.

या रस्त्यावरून सद्यस्थितीत प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या रस्त्यांचे त्वरित  काँक्रिटीकरण व्हावे यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी एमआयडीसी प्रशासनासमवेत बैठक घेतली होती.  त्यानंतर ५ ऑक्टोबर आणि ९ डिसेंबरला खासदार डॉ.शिंदे यांनी याबाबत एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत  पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून या संपूर्ण कामांसाठी एमआयडीसी प्रशासनाकडून १२६ कोटी ४६ लाख रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे हे रस्ते लवकरच सुस्थितीत  येणार असून नागरिकांचा प्रवास वेगवान होणार आहे. या रस्ते कामांना मंजुरी  दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत याचे आभार मानले आहेत.

येत्या दोन वर्षात रस्ते सुस्थितीत होणार

एमआयडीसी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या निविदेद्वारे खोणी ते फॉरेस्ट नाका हा ८ किलोमीटर रस्ता,  डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील  विको ते डीएनसी हा २ किलोमीटर रस्ता आणि औद्योगिक क्षेत्राबाहेरील रोटेक्स सेवा रस्त्याचे काम  येत्या दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे.

काटई ते अंबरनाथ या मार्गावरील काटई ते खोणी रस्त्यावरील एक मार्गिका नागरिकांसाठी प्रवासाकरिता खुली झाली आहे. तर दुसऱ्या मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे. याचाच पुढील टप्पा असलेल्या  खोणी ते फॉरेस्ट नाका या रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार असून येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर डोंबिवलीच्या औद्योगिक क्षेत्रातील इतर रस्त्यांबरोबरच डोंबिवलीच्या विको नाका ते डीएनएस जंक्शन आणि रोटेक्स सेवा रस्त्याचेही काँक्रीटीकरण होणार आहे, अशी माहिती खा.शिंदे यांनी दिली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या रस्ते काँक्रटीकरणाची कामे सुरु आहेत. या अंतर्गत डोंबिवली मध्ये ३८० कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. तर डोंबिवलीच्या औद्योगिक क्षेत्रातील वर्षानुवर्षे दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या कामांसाठी ११० कोटी निधी मंजूर करण्यात आले असून त्या रस्त्यांचे कामही सुरू आहे. काटई खोणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २०.४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून हे कामही शेवटच्या टप्प्यात आहे.