पितांबरीतर्फे कारसेवकांचा विशेष सन्मान

ठाणे : पितांबरी प्रोडक्ट्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पितांबरीच्या ठाणे येथील कार्यालयात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात १९९० व१९९२ साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झालेल्या पितांबरीमधील सहकाऱ्यांचा यथार्थ सन्मान करण्यात आला.

सुमारे ५०० वर्षांच्या संघर्षानंतर नुकतेच अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आले. या ऐतिहासिक विजयाची मुळे कारसेवकांच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. काहीजण या लढ्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरले तर काही सामाजिक जाणिवेतून मदतीची ढाल म्हणून उभे राहिले. यातीलच एक नाव म्हणजे रविंद्र प्रभुदेसाई. खरंतर रामजन्मभूमी या विषयाची कल्पना त्यांना लहानपणापासूनच होती. वयाच्या २१ व्या वर्षी ‘मंदिर वही बनाएंगे’, ‘जय श्रीराम’ असे नारे देत वडीलकै. वामनराव प्रभुदेसाई यांच्यासोबत स्थानिक आंदोलनात देखील ते सहभागी झाले होते. तेव्हापासूनच रविंद्र प्रभुदेसाई कारसेवकांची सेवा करण्याच्या दृढनिश्चयाने प्रेरित झाले.

म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, १९९० व १९९२ साली राम मंदिर आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झालेल्या, पितांबरीमधील सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. किशोर भवसार, अनिल मोरे, माधव पुजारी, मिलिंद मोरे, दीपक मेढेकर, दीपक सावंत, विलास मोरे, सुधाकर चंदनशिव, परेश देशपांडे, गिरीश पुराणिकव कै. उदय आगाशे यांच्यावतीने कुटुंबीयांनी या कारसेवकांचा रविंद्रजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप होते. या सोहळ्यासाठी रविंद्र प्रभुदेसाई यांच्याबरोबरच पितांबरीचे वाइस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई, डायरेक्टर प्रियांका प्रभुदेसाई आणि सीईओ माधव पुजारी हे देखील उपस्थित होते.

या प्रसंगी रविंद्र प्रभुदेसाई यांनी सोहळ्यामागची भावना आपल्या मनोगतातून स्पष्ट केली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पितांबरीच्या इतर अधिकाऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

सोहळ्यात ठाणेवैभव या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला ‘रामभक्ती ते राष्ट्रभक्ती!’हा लेख देखील सर्व उपस्थितांसमोर सादर करण्यात आला. या लेखाची संकल्पना ज्यांची होती ते सारथी एंटरप्राइझेसचे सीईओ मकरंद मुळे हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. रामजन्मभूमीचा लढा, त्यातील पितांबरीचे योगदान व प्रभू श्रीरामांना समर्पित ‘देवभक्तीजय श्रीराम उपासना मसाला अगरबत्ती’ या पितांबरीच्या नवीन उत्पादनाविषयी सविस्तर माहिती या लेखातून उपस्थितांना मिळाली.