ऐन सकाळी चाकरमानी खोळंबले
ठाणे: बुधवारी पहाटे कर्जत ते बदलापूर रेल्वे मार्ग धुक्यात हरवल्याने वासिंद ते टिटवाळा दरम्यान सकाळी साडेसहा ते नऊ आणि कर्जत ते बदलापूर दरम्यान साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली. परिणामी लोकल पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या.
शहापूरच्या वासिंद आणि कर्जत स्थानकापासून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या ९६ लोकल धावतात. ठाणे, मुंबईत काम करणार्या चाकरमान्यांना कार्यालय गाठण्यासाठी रोज दिड ते दोन तासांचा प्रवास करावा लागतो. पण धुक्यांमुळे या मार्गावरील रेल्वेची वाहतूक मंदावल्याने सर्वच लोकल १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी नऊ ते दहा वाजेनंतर लोकलसेवा सुरळीत झाली. पण तोपर्यंत अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विशेषता, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली स्थानकांमध्ये लोकलमध्ये चढताना प्रवाशांना कसरत करावी लागली.
वास्तविक मान्सून संपल्यानंतर जमिनीच्या पृष्ठ भागावर ओलावा शिल्लक असतो. स्वच्छ आकाश आणि वारा नसल्याने धुके तयार होण्यास पोषक वातावरण मिळते. शहरांच्या तुलनेत मोकळ्या जागेवर किंवा शेत जमिनीवर याचे प्रमाण जास्त असते. वासिंद, कर्जत ते बदलापूरपर्यंचा परिसर धुके तयार होण्यासाठी पोषक असल्याने गेल्या काही दिवसांपासून हा परिसर त्यामध्ये हरवून जात असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.