ठाणे बॅडमिंटन ॲकॅडमीचा कंझारकर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी सज्ज!

ठाणे: ठाणे बॅडमिंटन ॲकॅडमीचे उभरते प्रशिक्षक, माजी राष्ट्रीय खेळाडू आणि ठाण्याचे बॅडमिंटनपटू कबीर कंझारकर यांनी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून कबीरची निवड ‘बॅडमिंटन एशिया एज्युकेशन प्रोग्राम-बीडब्ल्यूएफ लेव्हल 1 कोचिंग कोर्स’ साठी झाली होती. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेला आणि गोवा बॅडमिंटन असोसिएशनने आयोजित केलेला हा कोर्स, मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, नावेली, गोवा येथे २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पार पडला.

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने या मानाच्या प्रशिक्षणासाठी राज्यातून निवड केलेल्या दोन प्रशिक्षकांमध्ये कबीर कंझारकर आणि अजय दयाल यांचा समावेश होता. सात दिवसांच्या या इंटेन्स कोर्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन प्रशिक्षणाचे सखोल मार्गदर्शन देण्यात आले. प्रसिद्ध प्रशिक्षकांनी खेळाडूंना शिकवण्याच्या विविध पद्धती, शारीरिक तंदुरुस्ती, खेळातील बारकावे आणि खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करवून घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसाठी आवश्यक असलेले स्टडी मटेरियल आणि कोर्स साहित्य पुरवले होते.
प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर कबीर कंझारकर म्हणाले, या कोर्समुळे मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ठाणे बॅडमिंटन ॲकॅडमीमध्ये आता अधिक जोमाने आणि नव्या ज्ञानाने मी प्रशिक्षणात सुधारणा करेन. ॲकॅडमीतून जास्तीत जास्त उच्च-दर्जाचे खेळाडू तयार करणे हे माझे ध्येय असेल,असे कबीर म्हणाले. या संधीसाठी त्यांनी ठाणे बॅडमिंटन ॲकॅडमी, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि प्रमुख प्रशिक्षक श्रीकांत वाड यांचे मनापासून आभार मानले.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे आयोजित या प्रशिक्षण वर्गात, कबीर कंझारकर यांनी उत्तम कामगिरी केली. या कोर्सच्या शेवटी घेण्यात आलेल्या परीक्षेतही त्यांनी उत्कृष्ट यश मिळवले.