ठाणे : शहरात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यात या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कामगार हॉस्पिटलच्या जागेवर गाळे बांधण्यात आले.
मात्र बाधित नसलेल्यांनादेखील गाळे देण्यात आले आहेत. दुसरीकडे याच ठिकाणी अतिरिक्त गाळे बांधून त्यांची विक्री केल्याची गंभीर बाब गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांत बाधित होत असलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येते. बाधित झालेल्या नागरिकांसाठी कामगार हॉस्पिटलच्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले. मात्र काही जणांना ताबा मिळाला नसल्याची बाब सभागृह नेते अशोक वैती यांनी महासभेच्या निदर्शनास आणून दिली. निर्धारित प्रमाणापेक्षा १५ ते २० गाळे अतिरिक्त बांधण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आक्षेप घेत हे कोणते धोरण आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अखेर महापौर नरेश म्हस्के यांनी या संपूर्ण कामाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.
मोबदल्यासाठी अतिरिक्त गाळे
ठेकेदाराकडून हे गाळे बांधून ते विस्थापितांना देण्यात आले आहेत. ठेकेदाराने याचा मोबदला म्हणून अतिरिक्त गाळे बांधले असल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले.