अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट ३ जूनला देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. पण अक्षयच्या चित्रपटाकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. शनिवार आणि रविवारी ‘सम्राट पृथ्वीराज’ने समाधानकारक कमाई केली. मात्र सोमवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.
सम्राट पृथ्वीराज’ने ४ जूनला (शनिवार) १२.६० कोटी रुपये तर ५ जूनला (रविवारी) १६.१० कोटी रुपये कमाई केली. मात्र ६ जूनला (सोमवार) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखीनच सुपरफ्लॉप ठरला. या दिवसाची चित्रपटाची कमाई फक्त ५ कोटी रुपये इतपत होती. म्हणजेच सोमवारी या चित्रपटाने ५० टक्के देखील कमाई केली नाही.
तर दुसरीकडे कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. या चित्रपटाने विकेण्डलाच बॉक्स ऑफिसवर १७५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. इतकंच नव्हे तर काही देशांमध्ये टॉप १० चित्रपटांच्या यादीमध्ये ‘विक्रम’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. ‘विक्रम’ला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा हा पहिलाच चित्रपट होता. अक्षय-मानुषीने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अधिकाधिक मेहनत घेतली होती. इतकंच नव्हे तर या चित्रपटाच्या कलाकारांनी अधिक मानधन देखील घेतलं होतं. ‘सम्राट पृथ्वीराज’कडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र अक्षयच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना नाराज केलं.