कल्याणच्या जलतरणपटूंची मोहीम फत्ते; मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर पोहून केले पार

कल्याण : महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यातील अनेक गड किल्ले यांची दुरावस्था झाल्याने याकडे शासनाने लक्ष द्यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सेक्रेड हार्ट स्कूल कल्याणच्या १४ विद्यार्थ्यांनी मुरुड-जंजिरा किल्ला ते पद्मदुर्ग असे एकूण नऊ किमीचे अंतर पोहून पार केले. ही सर्व मुले १२ ते १८ गटातील असल्याने या मुलांचे कौतुक होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या गड किल्ल्यांकडे आजच्या पिढीचे दुर्लक्ष होत आहे. या उपक्रमामुळे जलदुर्ग आणि गड किल्ल्यांकडे लोकांचे लक्ष वेधावे आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा मिळावी, महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळावी अशा उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित केला असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख श्रीराम म्हात्रे यांनी दिली.

या उपक्रमात कल्याणचे सक्षम म्हात्रे, अधिराज म्हात्रे, रोनित म्हात्रे अमोदिनी तोडकर, समृद्धी शेट्टी, तृष्णा शेट्टी, अद्विता जोडकर, अभिप्रीत विचारे, ऋतुराज विचारे, श्रीरंग साळुंखे, सिद्धार्थ पात्रा, मयंक पात्रा, निनाद पाटील, समर मोहोपे हे धाडसी विद्यार्थी सहभागी झाले व मोहीम यशस्वीपणे पार पडली. तसेच सोबत शिक्षक रामचंद्र म्हात्रे, काशीनाथ मोहोपे, संदीप तोडकर, देवेन्द्र साळुंखे, निलेश पाटील हे शिक्षक व पालकही होते.

उपक्रमाची सुरवात जंजिरा किल्ल्यातून झाल्याने हजरो पर्यटकांनी मुलांना टाळ्या वाजवून प्रोत्साहित केले. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जय शिवाजी जय जिजाऊ शिवरायांच्या गजरात मुलांनी पोहायला सुरवात करुन न दमता एकादमात हे अंतर पार केले. मुले पद्मदुर्गाला पोहचली तेव्हा तिकडेही पर्यटक असल्याने त्यांनी शिवगर्जनेत मुलांचे स्वागत केले. किल्यात जाऊन भगवा ध्वज फडकावुन सांगता झाली.