शिवसेना पदाधिकाऱ्यांची असहकाराची भूमिका
कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर कल्याण पूर्वेत शिवसेना-भाजपामध्ये असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपा उमेदवाराचे काम न करण्याचा निर्णय शिवसैनिकांनी घेतला असल्याचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले.
आमदार गणपत गायकवाड यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला होता. त्यानंतर देखील भाजपाने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून कल्याण पूर्वेतील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र जमत आपला विरोध दर्शविला आहे.
सध्यास्थितीला शिवसेनेचे 19 नगरसेवक, चार ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्या सोबत असून अपक्ष उमेदवारी बद्दल लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितले.
या नाराज शिवसैनिकांमध्ये दोन उपजिल्हा प्रमुख 19 नगरसेवक, चार ग्रामपंचायती आहेत. बंड पुकारलेल्या या नगरसेवकांमध्ये महेश गायकवाड, निलेश शिंदे, विशाल पावशे, स्नेहल पिंगळे, राजाराम पावशे, सारिका जाधव, माधुरी काळे, संगीता गायकवाड, राजवंती मढवी, देवानंद गायकवाड, मल्लेश शेट्टी, सुशीला माळी, नवीन गवळी, विमल भोईर, शरद पावशे आदींचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर यांनी दिली.