कल्याण : स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पातील कल्याण स्टेशन परिसराचा कायापालट होत असून याचाच भाग असलेल्या कल्याण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बस आगाराच्या नूतनीकरणास एसटी महामंडळाची मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस आगार नव्याने बांधण्यास ना हरकत दर्शविली. त्याप्रमाणे संचालक मंडळ, स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व संचालक मंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी मान्यता दिल्यानुसार महामंडळाच्या जागेच्या विकासासाठी आराखडे व नकाशे सादर करण्यात आले होते त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कल्याण रेल्वे स्थानक परिसरालगतच्या वाहतुकीचे सुसुत्रीत नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून बसस्थानक, आगार कार्यशाळा इ. आस्थपना बांधणेच्या संकल्पिय आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
कल्याण बस आगाराचे एकूण क्षेत्रफळ १७ हजार ७१९ चौ.मी आहे. प्रस्तावित नवीन कल्याण बस आगारामध्ये संचालक महामंडळाच्या मान्यतेनुसार अनेक बाबी समाविष्ठ आहेत. यामध्ये बसस्थानक आस्थापना प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छता गृहे, कार्यशाळा, व्यवसायिक क्षेत्र, १८ बस फलाट, दुचाकी वाहनतळ, बस वाहनतळ, परिवहन महामंडळाच्या बसेससाठी अप्रोच रोड, एकूण ८१ बसेस नाईट पार्किंगची सुविधा आदींचा समावेश आहे.
स्टेशन परिसरातून मार्गक्रमण करणे सुसह्य होण्याच्या दृष्टीने रेल्वे स्टेशन समोर बैलबाजार चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक सुमारे ११०० मी. लांबीचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस एस्.टी. डेपो मध्ये जाणे-येणेसाठी स्वतंत्र मार्गिका प्रस्तावित आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गे बैलबाजार दिशेने येणारी वाहतूक एसटी डेपो समोरुन भानू–सागर थिएटरमार्गे बैलबाजार स्मशान भूमी येथे कल्याण-शीळ रोड पर्यंत एकदिशा प्रस्तावित आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कल्याण बस आगार सुमारे ६० ते ७० वर्षापूर्वी बांधलेले असून सद्यस्थितीत मोडकळीस आले आहे. तसेच बस आगार मधील प्रवाश्यांसाठी असलेली बैठक व्यवस्था, स्वच्छता गृहे, उपहारगृह, पार्किंग इत्यादींचा अभाव असल्याने प्रवाश्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे झाले असल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण बस स्थानक नव्याने उभारण्यासाठी मान्यता मिळाली असल्याची माहिती एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी दिली.