उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या नगरसेवकाचे पद रद्द

​उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ ‘अ’ मधून निवडून आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक विक्की लबाना यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.

नाशिकच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर, महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदींनुसार विक्की लबाना यांना पालिका सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, विक्की लबाना हे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ ‘अ’ या नागरिकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी) राखीव जागेवरून निवडून आले होते. नियमानुसार त्यांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांच्याकडे सादर केले होते. ​तथापि, नाशिकच्या समितीने १३ मे २०२६ रोजी या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सहाय्यक जिल्हाधिकारी, नाशिक यांनी विक्की लबाना यांना निर्गमित केलेले ‘बंजारा’ जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द केले आहे, तसेच हे प्रमाणपत्र सरकारजमा करण्याचे आदेश दिले आहेत.

जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच १३ मे २०२६ पासून विक्की दर्शनसिंग लबाना हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १० (१-क) अन्वये पालिका सदस्य म्हणून अनर्ह (अपात्र) ठरले असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.