कल्याण-डोंबिवली महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

कल्याण: मुदत संपलेल्या राज्यातील महापालिकांना निवडणूक आयोगाने पत्र पाठवून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आज रोजी 13 मे ला आपली अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक, पिपंरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली महापालिकांना आयोगाने पत्र लिहिले होते.

यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. सदर निवडणुकीसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या १५,१८,७६२ असून लोकसंख्येच्या निकषानुसार निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १३३ इतकी आहे. सदरची निवडणूक ही बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार होणार आहे. एकुण प्रभागांची संख्या ४४ असून तीन सदस्यांचे ४३ प्रभाग व चार सदस्यांचा एक प्रभाग आहे (प्रभाग क्र. ४४). अनुसूचित जातीची लोकसंख्या १,५०,१७१ व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२,५८४ इतकी आहे.

अनुसूचित जातीसाठी एकुण १३ जागा राखीव राहणार असून त्यापैकी सात जागा स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी चार जागा राखीव राहणार असून त्यापैकी दोन जागा स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत. सर्वसाधारण स्त्रियांसाठी ५८ जागा राखीव राहणार आहेत. उर्वरित ५८ जागा या सर्वसाधारण असणार आहेत.

एकूण 997 हरकतीपैकी 375 मान्य करण्यात आल्या आहेत. त्यात 364 हरकती फक्त प्रभागांच्या नावासाठी घेण्यात आल्या होत्या. इतर बाबतीत ११ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार १३ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

राज्य निवडणुकीचे पुढील आदेश आल्यावर त्याप्रमाणे पुढील तरतूद करण्यात येईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली आहे.

नागरिकांना प्रभाग रचना पाहण्याची सोय सर्व प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर, महापालिका मुख्यालय व kdmcelection.com या संकेतस्थळावर १३ मे, २०२२ रोजी करण्यात आली आहे.