विकास आराखड्याविरोधात कळवेकरांचा एल्गार

ठाणे : ठाणे महापालिकेने नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले. या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

ठामपाने नवीन विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा-खारीगांव उद्ध्वस्त होणार आहे. आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून साडेतीनशे ते चारशे इमारतींवर वरवंटा फिरणार आहे. त्यामुळे ४५ हजार रहिवाशी बेघर होणार आहेत. त्याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असून त्याअनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखडय़ाविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रारुप विकास आराखड्यात कळवा आणि खारीगांव भागातील तब्बल 400 च्या आसपास इमारती बाधीत होणार आहेत. गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे. कळवा खाडी पुलापुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहेत. साधारणपणे ४५ हजारांच्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. येथील मंदिरे, मैदाने, बाधीत होत असल्याचेही डाॅ. आव्हाड यांनी सांगितले.

कळवा-खारीगांव येथील रहिवाशांना मारुन असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून या डी.पी. प्लानबाबत आश्वासन दिले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आपण याबाबत सरकारला जाब विचारणार आहोत, असेही डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आदी उपस्थित होते.