डोंबिबली : गावाहून मुंबईत मुलीकडे चाललेल्या एका आजीला दोन दिवसांचा मनस्ताप सोसावा लागला. नशीब बलवत्तर, नाहीतर बेवारस म्हणून एखाद्या अनाथ आश्रमात जाण्याची वेळ आली असती. पोलिसांच्या तत्काळ प्रयत्नाने ती सुखरूप घरी पोहचली.
याबाबत पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, लेकीच्या घरी येण्यासाठी आजीने रत्नागिरीमधून एसटीने प्रवास केला. बसचालकाला आजीने कळंबोलीला उतरणार असल्याचे सांगितले. मात्र बसचालकाने डोंबिवली ऐकल्याने आजीला डोंबिवलीत उतरविले. काही वेळाने आपण चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे आजीला समजले, पण लेकीच्या घरी कधी जाणार या चिंतेत डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल जवळ एका दुकानाजवळ दोन दिवसांपासून आजी रडत बसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी मानपाडा पोलिसांना माहिती दिली.
मानपाडा पोलिसांनी आजींची विचारपूस केल्यावर सुरुवातीला व्यवस्थित माहिती देऊ शकली नाही. पोलिसांनी तिला खात्री दिल्यानंतर घाबरलेल्या आजीने माहिती दिली. आजीकडून माहिती मिळताच पोलिसांनी आजीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. रत्नागिरी मुर्डव येथे राहत असलेल्या आजींच्या मुलाला फोन केला. यावेळी मुलगा आईला तळोजा भागात शोधत असल्याचे समजताच त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात आई आणि मुलाची भेट झाली.