अंबरनाथ : अंबरनाथहून आनंदनगर एमआयडीसीला जोडणारा आणि काटई नाका ते कर्जतकडे जाणारा राज्य महामार्गावरील काकोळे गावचा पूल धोकादायक झाला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
काटई नाक्यावरून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग हा अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडण्यात आला आहे. या महामार्गावर काकोळेगाव असून राज्य महामार्गावरून काकोळे वळणावर असलेला जुना पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. या ब्रिजखालून वालधुनी नदी वाहत असून हा ब्रिज कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या राज्य महामार्गाचे काम करताना कर्जत दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पूल बांधण्यात आला असून काटई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल अजूनही तसाच ठेवण्यात आला आहे.
वास्तविक या पुलाची देखील नव्याने उभारणी करणे गरजेचे होते. मात्र निधीअभावी या पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. आता या पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट करून तो धोकादायक ठरवावा आणि त्या ठिकाणी नव्याने पूल उभारावा, अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. सध्या वालधुनी नदी स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आला असून या कामाच्या वेळी पुलाचे बांधकाम धोकादायक असल्याचे आढळून आले. राज्य महामार्गावरील वालधुनी नदीवरील हा पूल महत्त्वपूर्ण असून त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये यासाठी वेळीच या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारावा अशी गरज व्यक्त होत आहे. या पुलाची वस्तुस्थिती पाहता पुलावरील लोखंडी सळई पूर्णपणे गंजल्या असून अनेक ठिकाणी कॉंक्रिटचा थर निखळून पडला आहे. वालधुनी नदीवर हा पूल असल्याने त्यांची दुरावस्था सहसा नागरिकांना दिसून येत नाही. पुलावर अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.