कडोंमपा सुरक्षा रक्षकाने बेकायदा बांधकाम केल्याचे उघड

अभियंत्याचा अहवाल साहाय्यक आयुक्तांना दाखल

कल्याण: कल्याण-डोंबिवली पालिकेतील वरिष्ठ सुरक्षा रक्षकाने कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा भागात बेकायदा बांधकाम केल्याचा अहवाल कनिष्ठ अभियंत्याने आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना दिला आहे.

या अहवालामुळे वरिष्ठ सुरक्षा रक्षकाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातील झेंडे काॅलनी चाळीमध्ये तळाच्या खोलीवर आणखी वरील मजला बांधून सुरक्षा रक्षकाने बेकायदा बांधकाम केले आहे, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश पौळकर यांनी गेल्या महिन्यात आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे केली होती.

या तक्रारीनंतर साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी बांधकामाची कागदपत्र दाखल करण्याची नोटीस बांधकाम धारकला बजावली होती. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना बेकायदा बांधकाम केल्याच्या घटनास्थळाची पाहणी करुन वास्तवदर्शी अहवाल दाखल करण्याच्या सूचना मुंबरकर यांनी केल्या होत्या. या आदेशाप्रमाणे बांधकाम विभागाचे उप अभियंता संतोष ठाकूर, साहाय्यक अभियंता दत्ताराव मोरे यांनी बांधकाम धारक यांनी चिंचपाडामध्ये झेंडे काॅलनीमध्ये बांधलेल्या बांधकामाची पाहणी केली. चाळीच्या बांधकामावर एक मजल्याचे वाढीव बांधकाम त्यांनी केल्याचा अहवाल बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांना दिला आहे.

या अहवालामुळे सुरक्षारक्षकाने बेकायदा बांधकाम केल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियम कायद्याने कारवाई करावी, अशी मागणी पौळकर यांची आहे.बेकायदा बांधकाम करणारा लोकप्रतिनिधी, त्याचा नातेवाईक कायद्याने दोषी ठरू शकतो. पालिका हद्दीतील काही नगरसेवक या बेकायदा बांधकाम प्रकरणामुळे सहा वर्षासाठी राजकारणातून बाद झाले आहेत. काही अधिकाऱ्यांनाही याचा फटका यापूर्वी बसला आहे.

पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कार्यवाही जोरदारपणे कल्याण पूर्वेत आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, टिटवाळ्यातील साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचोरे, ह प्रभागात साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांच्याकडून सुरू आहेत. प्रभागातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश आयुक्तांनी यापूर्वीच सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. एकीकडे प्रशासन बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी प्रयत्नशील असताना पालिकेतील एका सुरक्षा रक्षक बेकायदा बांधकाम करत असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. राजकीय आशीर्वादाने हे बेकायदा बांधकाम झाले असल्याची चर्चा पालिकेत आहे. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी या प्रकरणात वरिष्ठांचे मार्गर्शन घेऊन योग्य ती कार्यवाही या प्रकरणात केली जाईल, असे सांगितले.