रस्ताबाधित वृद्ध महिलेला कडोंमपाने केले बेघर

कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार उघडकीस आला असून रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या वृद्ध विधवा महिलेला तीचे पुनर्वसन न करताच बेघर केले आहे. एका वृद्ध महिलेला अशा प्रकारे बेघर केल्याने नगरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत 65 इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असताना एका विधवा महिलेच्या घरावर बुलडोझर चढवत महापलिकेने तिला बेघर केले आहे. कल्याण पश्चिमेतील सह्याद्री नगर येथे पुनर्वसनाआधीच महिलेला बेघर केल्यामुळे महिलेचा संसार रस्त्यावर आला आहे. रस्ता रुंदीकरणात दोन फूट घर जात असताना देखील पालिका अधिकाऱ्यांनी संपूर्ण घरावर बुलडोझर चालवत महिलेला बेघर केले आहे.

बेघर महिलेच्या व्यथा ऐकण्यासाठी पालिका अधिकारी सक्षम नसल्याचा महिलेचा आरोप असून विकासकाच्या इमारतींना रस्ते पुरवण्यासाठी घरावर बुलडोजर चालवण्याचा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केला आहे. पुष्पा अंकुश असे बेघर झालेल्या महिलेचे नाव असून महिलेचा संसार उघड्यावर आल्यामुळे महिला हवालदिल झाली आहे.

या महिलेला बीएसयुपी योजनेत घर देतो असे सांगण्यात आले मात्र बीएसयुपी प्रकल्पातील घरात गेले असता त्या घरांना दरवाजे, खिडक्या, वीज, पाणी नाही. तर काही घरांना टाळे असून हे टाळे तोडून राहण्याचा अजब सल्ला या अधिकाऱ्यानी दिल्याचे महिलेने सांगितले. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.