उल्हासनगर महापालिकेचा पुढाकार
उल्हासनगर : घरातील एखादा कार्यक्रम असल्यास सभागृहांची शोधाशोध करावी लागते. त्यात पालिकेच्या सभागृहांची नोंदणी करावी लागते. मात्र या नोंदणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पालिका अधिकाऱ्यांकडे धावाधाव करावी लागते. आता उल्हासनगरातील नागरिकांची ही धावाधाव बंद होणार आहे.
एखाद्या हॉटेलप्रमाणे उल्हासनगर शहरातील समाज मंदिर, सभागृह, उद्याने, शाळांची सभागृह आणि पालिकेच्या मालमत्ता नोंदणी करता येणार आहेत. या डिजीटल निर्णयाबद्दल उल्हासनगर महापालिका प्रशासनाचे कौतुक केले जाते आहे.
उल्हासनगर महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसात कार्यालयीन प्रणाणी अद्ययावत करण्याकडे लक्ष दिले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पालिका मुख्यालयात येणारे अभ्यांगत, पालिकेतील दालनांचे फलक, ई कार्यालय प्रणालीचा अवलंब असे निर्णयही पालिका प्रशासनाने घेतले होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या अभियानात उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले होते.
यानंतर आता उल्हासनगर महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. शहरातील सुमारे १४१ समाद मंदिरे, २० शाळा सभागृह, ४ भाजी मंडई, ६१ उद्याने आणि तीन पालिकेच्या मालमत्ता भाडेतत्तावर देण्यात येतात. याच्या नोंदणीसाठी आधी नागरिकांना पालिका कार्यालय, प्रभाग समित कार्यालयात धाव घ्यावी लागत होती. चांगली तारीख, चांगली वेळ निवडण्यासाठी राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे विशेष ओळख काढावी लागत होती. त्यामुळे ज्याचा संपर्क त्याला चांगला दिवस आणि वेळ सहज मिळत होता. मात्र उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी आता ही संपूर्ण यंत्रणाच ऑनलाईन केली आहे. नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात करण्यात आला.
कशी करणार नोंदणी
http://www.umcestate.com या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांनी स्वतःची नोंदणी करून सभागृह नोंदणी करायची आहे. यात मैदान, भाजी मंडई, उद्यान, शाळा, समाज मंदिर आणि पालिका मालमत्ता असे पर्याय आहेत. यात कार्यक्रमाचा दिवस, हेतू, वेळ, सुरक्षा अनामत रक्कम आणि नोंदणी शुल्क भरून आधार क्रमांक आणि कार्यक्रम पत्रिका जोडून नोंदणी करता येईल.
इच्छुकांचा जीव भांड्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला आहे.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी या सहा महापालिका असून अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आहेत. या पालिकांचा निवडणूक कार्यक्रम कसा असेल, कोणत्या टप्प्यात कोणत्या स्थानिक स्वराज्य निवडणुका होतील, पॅनल काय असतील, प्रभाग रचना कशी असेल अशा प्रश्नांनी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
जुन्या ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार हे कळताच ठाणे जिल्ह्यातील राजकीय पक्षांतील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छूकांमध्ये आशेचे धुमारे फुटले आहेत.
ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि नवी मुंबई या दोन महत्त्वाच्या महापालिका आहेत. याशिवाय इतर चार महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत टप्प्याटप्प्याने संपल्या होत्या. त्यामुळे होणार्या निवडणुका या त्याच टप्प्याने होणार की, एकत्रित होणार याविषयी स्पष्टता नसल्याने संभ्रमही वाढल्याचे दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार चार आठवड्यात अधिसुचना निघणार आहे. पण सर्वप्रथम मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांचा क्रमांक लागेल. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील महापालिका कोणत्या क्रमांकावर असेल असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकांची मुदत पाच वर्षांपूर्वी संपली होती. त्यानंतर अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आणि मग ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या स्थानिक संस्थांची मुदत तीन वर्षांपूर्वी संपली होती. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर तेव्हापासून प्रशासक असल्याने सर्व माजी नगरसेवकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पद नसले तरी भावी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सढळ हस्ते ‘स्वनिधी’ खर्च करावा लागत होता. त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू देत असे साकडे इच्छूक घालत असल्याचेही पहायला मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि संपलेली मुदत कंसात
कल्याण-डोंबिवली (नोव्हेंबर २०२०)
नवी मुंबई (मे २०२०)
ठाणे (मार्च २०२२)
मीरा-भाईंदर (ऑगस्ट २०२२)
भिवंडी (जून २०२२)
उल्हासनगर (एप्रिल २०२२)
अंबरनाथ (मे २०२०)
बदलापूर (मे २०२०)