कल्याण : कल्याणमधील अजित कारभारी यांनी रशियामधील एरोग्लॅड कोलम्ना येथे ५१०० मीटर म्हणजे १६,७३२ फुट उंचावरून विमानातून झेप घेत शिवरायांची प्रतिमा असलेला ध्वज फडकावत शिवरायांना मानवंदना दिली. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय ठरले.
कल्याणमधील कोळीवली गावातील कुस्तीपटु कै. बळीराम कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांनी निवृत्त ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत यांच्या प्रोत्साहनाने रशियामधील एरोग्लॅड कोलम्ना येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानामध्ये एल ४१० या हवाई जहाजातून ५१०० मीटर म्हणजे १६,७३२ फुट उंचावरून आकाशात झेप घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देत अशी कामगिरी करणारे ते प्रथम भारतीय नागरिक ठरले.
कर्नल कोस्त्या क्रिवोशिव (२७००० जंप मास्टर-रशियन आर्मी स्कायडाइव मुख्य प्रशिक्षक आर्मी बेस), यूनाइटेड स्टेट पॅराशूट असोसिएशन (अमेरिका) चे स्काईडाइविंग प्रशिक्षक राहुल देसाई (डकरे) यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी ही साहसी कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.