नवी दिल्ली: भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. लवकरच अध्यक्षपदाचा कार्यकाळ समाप्त होत असलेल्या जे. पी. नड्डा यांची भाजपाकडून राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
मूळचे हिमाचल प्रदेशमधील असलेले जे. पी. नड्डा हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सध्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार ते सांभाळत आहेत. नड्डा यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा काही महिन्यांपूर्वीच संपुष्टात आला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
जे. पी. नड्डा यांच्यापूर्वी पीयूष गोयल हे राज्यसभेतील सभागृह नेतेपदी होते. मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली. तसेच ते तिथून मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले होते. १४ जुलै २०२१ रोजी पक्षाने त्यांची राज्यसभेतील सभागृहनेतेपदी नियुक्ती केली होती.