अँबर हर्डला १.५ कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश
वॉशिंग्टन : हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि त्याची आधीची पत्नी अँबर हर्ड यांच्या सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात डेप विजयी झाला. न्यायालयाने या खटल्यात डेपच्या बाजूने निकाल दिला असून अंबर हर्डने १.५ कोटी अमेरिकी डॉलरची नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांच्यातील कायदेशीर लढाई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २०१८ मध्ये ‘वॉिशग्टन पोस्ट’मधील एका लेखात हर्डने डेपवर गंभीर आरोप केले. आपण कौटुंबिक हिंसाचाराने पीडित असून जॉनीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या लेखात करण्यात आला. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर जॉनी डेपने अँबरने माझी बदनामी केल्याचा आरोप करून तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आणि पाच कोटी डॉलरची मागणी केली. त्याविरोधात अँबरनेही शारीरिक हिंसा आणि छळाचा दावा करत १० कोटी डॉलरची मागणी केली. गेल्या सहा आठवडय़ांपासून हा खटला चालू असून त्यात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. ज्युरींच्या सात सदस्यांनी गेल्या तीन दिवसांत तासन् तास चर्चा केली आणि अखेर गुरुवारी निकाल जाहीर केला. न्यायालयाने डेपची बाजू योग्य असल्याचे सांगत हर्डला १.५ कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले. त्याशिवाय न्यायालयाने डेपलाही दंड सुनावला आहे. हर्डच्या काही मानहानीसाठी तो दोषी आढळला असून त्याला २० लाख डॉलरची भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे.