हौशी खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची महाराष्ट्र खो- खो असोसिएनशी संलग्न असलेल्या दि अमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्व सदस्यांनी एकमताने ही निवड केली. उपमुख्यमंत्री तथा खो-खो चे आश्रयदाते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची एक बैठक पुणे येथे झाली. या सभेमध्ये सर्व सदस्यांनी ठाणे येथील दि अमॅच्युअर खो-खो असोसिएशन या संघटनेला मान्यता देऊन महाराष्ट्र खो खो असोसिएशनशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या जिल्हा संघटनेच्या स्थापनेकरिता तसेच या जिल्हा संघटनेस मान्यता देण्याकरिता भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव गोविंद शर्मा, अस्थायी समिती ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप तावडे यांनी विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

मान्यता मिळाल्यानंतर दि अ‍मॅच्युअर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये डॉ. जितेंद्र आव्हाड यांची अध्यक्षपदी तर मंदार कोळी यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय, उपाध्यक्षपदी सुधीर थळे, कमलाकर कोळी आणि ऋतुराज ठाणेकर, सहसचिव म्हणून माधुरी कोळी, कृष्णा माळी, मोनीष भापकर, अमित परब यांची निवड झाली. खजिनदारपदी महेश पालांडे तर सदस्य म्हणून हेमंत कोळी, हर्षल कोळी, महेश कौचे यांची निवड करण्यात आली.