‘सैराट’ या चित्रपटातून अनेकांची मने जिंकणारी जोडी अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे परश्या आणि आर्चीला बीग बींसोबत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
३ मिनिटे १ सेकंदाचा ट्रेलर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन हे फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. ते झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना एकत्र करुन एक फुटबॉल टीम तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यासाठी त्यांना अनेक अडचणी येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
तसेच चित्रपटाच्या ट्रेलरमधील म्युझिकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘झुंड’ या चित्रपटाला अजय-अतुल या जोडीने संगीत दिले आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर असल्याचे म्हटले जात आहे.
अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.