उदय सबनीस यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार प्रदान

* लीना भागवत यांना गंगा-जमुना पुरस्कार
* अरुंधती भालेराव, निकीता भागवत, दत्तात्रय तथा दत्तू मोरे सन्मानित

ठाणे: ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन २०२४चा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर, गंगा-जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना रविवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रातील अरुंधती भालेराव, साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा तर, लक्षवेधी कलाकार पुरस्काराने अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही सन्मान खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला.

रविवारी सायंकाळी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, पी. सावळराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओमकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ‘जनकवी पी. सावळाराम पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना प्रदान करण्यात आला. ७५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तर, अभिनेत्री लीना भागवत यांना प्रदान करण्यात आलेल्या गंगा-जमुना पुरस्कारा’चे स्वरुप ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे. निकिता भागवत, अरुंधती भालेराव व दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.

जनकवी पी. सावळाराम यांची नवीन पिढीस ओळख व्हावी यासाठी, ठाणे महापालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा ठाण्यातील रसिकांनी केलेला गुणवंतांचा सन्मान आहे. साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन करून कलागुणांना प्रोत्साहन देणारी ठाणे महापालिका एकमेव असल्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन या पुरस्कार सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी केले. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी खासदार म्हस्के यांनी शुभेच्छाही दिल्या.

माझ्या आयुष्यात पुरस्कारांची तशी वानवाच आहे. पण, ‘जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार’ मिळाला आणि माझ्या आयुष्यातील पुरस्काराचे दुर्भिक्ष्य संपले. पी सावळाराम हे संगीतातील आणि राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तीचा सहवास मला लाभला. आज त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याबद्दल ती व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यात आहे, असे मला वाटत असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. कला सरगम आणि टॅग या दोन संस्थांचा त्यांच्या वाटचालीत असलेल्या योगदानाचीही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

पी. सावळाराम यांच्या गीतांची साथ शालेय दशेपासून ते पहिल्या नाटकातल्या पहिल्या प्रवेशापर्यंत आणि पुढेही राहिली. आता तर या पुरस्कारामुळे ते नाव माझ्यासोबत कायम राहील असेही त्या म्हणाल्या. ‘गंगा-जमुना’ या गाण्यातून पी. सावळाराम यांनी एका आईची भावना अतिशय नेमकेपणाने मांडली. हे परकाया प्रवेशाचेच रुप होते, असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव ठाणे महापालिकेने केला. त्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावना अरुंधती भालेराव यांनी व्यक्त केली. तर, लेखन क्षेत्रात करीत असलेल्या कामगिरीला बळ देणारा हा पुरस्कार असल्याचे निकिता भागवत यांनी म्हटले. दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांनी या पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी आली आहे. त्याचे भान कायम ठेवीन, असे प्रतिपादन केले.

सोहळ्याची सुरूवात, रंगाई निर्मित, जनकवी पी. सावळाराम यांच्या गाण्यांचा ‘सावध हरिणी सावध ग!’ या कार्यक्रमाने झाली. पुरस्कार सोहळा झाल्यावर उत्तरार्धही पी. सावळाराम यांच्या गीतांनी रंगला. या कार्यक्रमात, अमृता दहिवेलकर, सुराज सोमण, केतकी भावे-जोशी यांनी पी. सावळाराम यांची गाणी सादर केली. त्याचे संगीत संयोजन विनय चेऊलकर यांचे आणि निर्मिती दिगंबर प्रभू यांची होती. निवेदक दिपाली केळकर यांनी पी. सावळाराम यांचा जीवनपट उलगडत प्रत्येक गाण्याची समर्पक ओळख करून दिली. पुरस्कार सोहळ्यात, प्रास्ताविक उदय पाटील यांनी केले. तर सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन साधना जोशी यांनी केले. सावळाराम कुटुंबीय आणि रसिक ठाणेकर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.