नियोजित वाढीव पाण्यासाठी उभे राहू लागले जलकुंभ

सुविधा भूखंडावरील जलकुंभांसाठी आ.संजय केळकर यांचा पाठपुरावा

ठाणे : वाढत्या ठाण्याची पाण्याची तहान भागवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त ५० एमएलडी पाण्याची मागणी लावून धरली आहे. भविष्यात मिळणारे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी जलकुंभांची गरज असून सुविधा भूखंडावर जलकुंभ उभारले जाऊ लागले आहेत. श्री.केळकर याबाबत सातत्याने पाठपुरावा करत असून नुकतेच त्यांच्या हस्ते २५ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या कल्पतरू पार्क सिटी कोलशेत जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले.

ठाणे शहराला एकीकडे कमी पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई भेडसावत असताना दुसरीकडे विशेषतः घोडबंदर परिसरात अनेक बहुमजली भव्य गृहसंकुले उभी राहत आहेत. येथे राहण्यास येणाऱ्या हजारो रहिवाशांना मग पाणी कुठून देणार, असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केळकर गेल्या काही वर्षांपासून वाढीव पाण्याची मागणी करत असून अधिवेशनातही आवाज उठवत आहेत. त्याच बरोबर नियोजित वाढीव पाणी साठवण्यासाठी पुरेसे जलकुंभ उभारण्यासाठी ते पाठपुरावाही करत आहेत. विकासकांनी प्राधान्याने सुविधा भूखंडावर जलकुंभ उभारावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत. नुकतेच त्यांच्या हस्ते २५ दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेल्या कल्पतरू पार्क सिटी, कोलशेत जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे परिसरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. या आधी त्यांच्या पाठपुराव्यामुळे लोढा आणि हायलॅण्ड येथील जलकुंभ मार्गी लागले आहेत. आगामी काळात अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी पुरेसे जलकुंभ उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.

विविध स्त्रोतांतून मिळणारे ५८५ एमएलडी पाणी शहरातील ८० जलकुंभांमार्फत वितरित केले जात आहे. कळवा, मुंब्रा, दिवा भागात १५ आणि केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून १४ असे २९ जलकुंभ प्रस्तावित आहेत. सुरळीत पाणी वितरणासाठी सर्वाधिक भूमीगत जलवाहिन्या या घोडबंदर परिसरात आहेत. यात आता आणखी ७४ कि.मी.च्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मनोरमानगर येथे २० लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ, कळवा आणि विटावा येथे १२० अश्वशक्तीचे पंपींग मशिन बसविण्यात येणार आहे.

दीड लाख कुटुंबांना पाणी टंचाईची झळ
प्रस्तावित २९ जलकुंभ हे प्रत्येकी २० ते २५ लाख लिटर क्षमतेचे आहेत. यातून सुमारे सात कोटी २५ लाख लिटर पाण्याचा साठा होणार आहे. त्याचा लाभ सुमारे दीड लाख कुटुंबांना होणार आहे. तूर्त या कुटुंबांना पाणी टंचाईशी सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.