घाऊकमध्ये २०० तर किरकोळ बाजारात ४०० रुपये किलो
नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे शेवग्याच्या शेंगांच्या उत्पादनाला फटका बसला असून बाजारात सध्या आवक रोडावली आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात शेवगा १५० ते २०० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ४००-४२० रुपयांनी विक्री होत आहे. त्यामुळे ऐन थंडीत शेवगा गरम झाल्याने परिपूर्ण आहार महाग झाला आहे.
एपीएमसी बाजारात सध्या शेवग्याच्या शेंगांचा तुडवडा भासत आहे. बुधवारी बाजारात अवघी एक गाडी दाखल झाली असून केवळ ९१ क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे दराने उच्चांक गाठला आहे.
पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरू नगर तसेच संगमनेर आणि तामिळनाडू येथून शेवगा बाजारात दाखल होतो. मात्र राज्यात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे आणि तामिळनाडू येथील वादळामुळे उत्पादनाला फटका बसला आहे. ऐन पिक उभारीच्या वेळी फुलगळती तर शेवग्याला पाणी लागल्याने शेंगा काळवंडल्या, त्यामुळे उत्पादनात घट झाली असून परिणामी बाजारात आता मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यल्प आहे.
शेवग्याची शेंग गुणकारी असल्याने त्याला मागणी आहे. भाजी, सांबार, सुपसाठी शेंगा वापरल्या जातात. शेवग्यात कॅल्शियम असल्याने त्यांना मागणीही मोठी असते.
सध्या शेवग्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ५०-८० रुपयांनी उपलब्ध असलेल्या शेंगा आता १५०-२०० रुपये तर किरकोळीत ४००-४२० रुपये दराने विक्री होत आहे. नवीन उत्पादन दाखल होईपर्यंत दरात तेजी राहणार आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.