मुंबई : ठाण्यातील वागळे इस्टेट आयटीआय तसेच कोपरी आयटीआयच्या ताब्यातील जागा क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे महापालिकेस वर्ग करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
यासंदर्भात कौशल्य विकास विभाग आणि ठाणे महापालिका यांनी त्वरीत संयुक्त बैठक घ्यावी. आयटीआयच्या मुलांची सोय व्हावी व त्यांचे नुकसान होऊ नये या पद्धतीने चर्चा करुन कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज ठाणे जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका झाल्या. आयटीआयच्या प्रश्नावर झालेल्या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयटीआय परिसरातील काही ईमारती जुन्या झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरुस्ती, पुनर्विकास करण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. आयटीआय मुलांची सोय व्हावी, त्यांचे नुकसान होऊ नये या पद्धतीने नियोजन करण्यात यावे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.