दोन लोकलमधील जास्त वेळेचे अंतर कमी करणार

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या बैठकीत

ठाणे : कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या भूसंपादनाबाबत वन विभागाच्या जागेसंदर्भात केंद्र सरकारच्या स्तरावरून दोन्ही मंत्रालयांमध्ये पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज घेतला. त्याचबरोबर सकाळी व सायंकाळी होणारी लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी श्री. कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. तर आगामी काळात जाहीर होणाऱ्या नवीन वेळापत्रकात बदलापूर स्थानकातील काही लोकलच्या वेळेमधील अंतर कमी करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.

कल्याण ते वांगणी आणि कल्याण ते कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या समस्या व सुविधांबाबत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर ठाण्यात आज बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा रेल्वेमार्गावरील प्रत्येक रेल्वे स्टेशननुसार सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यावर उपाययोजना करण्यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच माजी नगराध्यक्ष राम पातकर, भाजपाचे बदलापूर पूर्व अध्यक्ष संजय भोईर, प्रवाशी संघटनेच्या कविता गुलाठी, श्रीकांत चिमोठे आदी उपस्थित होते.

बदलापूर रेल्वे स्टेशनमधून ये-जा करणाऱ्या गाड्यांच्या वेळातील अंतर पुढील वेळापत्रकात कमी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांनी सांगितले. तर तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे काम पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. वन विभागाच्या बदललेल्या नियमानुसार भूसंपादनाबाबत अडचणी आहेत, असे श्री. गोयल यांनी स्पष्ट केल्यावर केंद्र सरकारच्या पातळीवर दोन्ही मंत्रालयांमध्ये समन्वय साधून उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जाहीर केले. या बैठकीत रेल्वेतील गर्दी कमी करण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी श्री. गोयल यांनी ८०० सरकारी व खासगी आस्थापनांना कर्मचाऱ्यांची वेळ बदलण्याबाबत आवाहन केले असल्याचे नमूद केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य सरकार व रेल्वेची विशेष बैठक घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री. कपिल पाटील यांनी जाहीर केले.

आसनगाव येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव मागविण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. तर तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या कामानंतर आसनगाव येथे होम प्लॅटफॉर्म उभारला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. तर भविष्यातील विकास लक्षात घेऊन नियोजित कासगाव (चामटोली) ते नवी मुंबईतील कामोठे रेल्वेमार्ग उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली.

बदलापूर होम प्लॅटफॉर्म, टिटवाळा रेल्वे उड्डाणपुलाचे २४ फेब्रुवारीला उद्घाटन

बदलापूर रेल्वे स्टेशनमधील होम प्लॅटफॉर्म व टिटवाळा येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज बैठकीदरम्यान केली. गेल्या अनेक वर्षांपासूनची होम प्लॅटफॉर्मची मागणी पूर्ण होत असून, टिटवाळा पूर्व व पश्चिम भाग रेल्वेपुलामुळे जोडला जाणार आहे.