पालिका, वन विभागाची मोहीम
ठाणे : मासुंदा तलाव परिसरात मुक्तपणे संचार करणाऱ्या सीगल पक्ष्यांना शेवगाठी, पाव, बिस्कीट असे खाद्य खाऊ घालणाऱ्या बेजाबदार नागरिकांवर कारवाईचे ‘जाळे’ टाकण्यात आले आहे. ठाणे पालिका व वन विभागाच्या विशेष पथकाने आज पक्ष्यांना खायला घालणाऱ्या या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने अशा महाभागांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मासुंदा तलावातील सीगल पक्ष्यांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे.
मासुंदा तलाव परिसरात सीगल्स पक्ष्यांना शेव गाठी, पाव, बिस्कीट असे प्रक्रिया केलेले अन्न खाऊ घालणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई ठाणे प्रादेशिक वन विभाग व ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे संयुक्तपणे केली गेली. गेल्या दोन आठवड्यांपासून मासुंदा तलाव परिसरात या पक्ष्यांना खाणे टाकू नये यासाठी वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन व येऊर एन्व्हायर्नमेंटल संघटनातर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना खाणे टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी कार्यकर्ते तलावाभोवती फिरून सीगल्स पक्ष्यांविषयी माहिती देत जन प्रबोधनाचे काम करत आहेत. सीगल्सना तळलेले प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ घातल्याने त्यांना विविध व्याधी होण्याचा धोका संभवतो. हजारो किमीचा परतीचा प्रवास करण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे वन विभाग व ठामपातर्फे पक्ष्यांना खाणे टाकल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देणारे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा काही बेजबाबदार नागरिक या सुचनांना न जुमानता तलावात खाणे टाकणे, कार्यकर्त्यांशी हुज्जत घालून हमरीतुमरीवर येण्याचे प्रसंग घडत होते. या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी कडक भूमिका घेत अशा बेजबाबदार नागरिकांना वचक बसावा यासाठी आजपासून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली.
कारवाईत सातत्य हवे
मासुंदा तलाव येथे गेली ३ वर्षे आम्ही सातत्याने जनजागृती मोहीम घेत आहोत. या प्रयत्नांना बहुतांशी यश येताना दिसत असले तरी हे प्रकार संपूर्णतः आटोक्यात आलेले नाही. दिवसभर येथे पाळत ठेवणे अशक्य आहे. संबंधित यंत्रणांतर्फे आज प्रथमच दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचे आम्ही स्वागत करतो. सीगल्स पक्ष्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या व तलाव प्रदूषित करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने होणे गरजेचे आहे.
– रोहित जोशी, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी