पावसाने दुसऱ्या दिवशीही झोडपले

ठाणे: सलग दुसऱ्या दिवशी पावसाने ठाणे शहराला झोडपून काढले आहे. शहरातील काही सखल भागात पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेकांनी पावसाचा आनंद लुटला.

सुमारे २० दिवसाच्या प्रतिक्षेनंतर ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाने कालपासून दमदार सुरुवात केली आहे. आज सकाळपर्यंत ठाण्यात ५८.९० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत शहरात १३९.७६ मि.मी. पाऊस पडला आहे. शहरात रात्री साडे आठ वाजेपर्यंत १५.४१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

सकाळपासूनच शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे शहरातील चार ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत तर काल सात झाडे पडली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी ही झाडे बाजूला सारून रस्ता मोकळा करून दिला. ठाण्यातील वंदना सिनेमा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल पाणी तुंबले होते. शहरातील नाले सफाईची कामे वेळेवर पूर्ण करण्यात आल्यामुळे नाल्याच्या परिसरात पाणी तुंबले नसल्याचे चित्र दिसत होते. शहरात कुठेही दुर्घटना घडल्यास बचावकार्य करण्यासाठी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.